Last Updated: 02/11/2023By Categories:

उत्तम करिअरसाठी स्वयं अध्ययन, नियोजन, सराव ही यशाची त्रिसूत्री महत्त्वाची
ॲड. राहुल नावंदर यांचे प्रतिपादन.

स्वयं अध्ययन करून नियोजन, उजळणी आणि सराव ही यशाची त्रिसूत्री अंगीकारली तर भविष्यात यश मिळवण्यासाठी कोणी रोखू शकत नाही. असे प्रतिपादन व्याख्याते, समुपदेशक ॲड. राहुल नावंदर यांनी केले.

निमित्त होते, सहकार महर्षी बाळासाहेब पवार वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे. पुढे बोलताना ते म्हणाले की, दैनंदिन जीवनात शारीरिक व्यायाम, ध्यान, कौटुंबिक संवाद या गोष्टी संतुलित व्यक्तिमत्व घडवण्यासाठी आवश्यक आहे. त्याचा अंतर्भाव प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या दैनंदिन जीवनात केला पाहिजे. ज्ञान, कौशल्य आणि संतुलित व्यक्तिमत्व यांची जडणघडण होण्याचा कालावधी म्हणजे शिक्षण होय, अशी शिक्षणाची व्याख्या त्यांनी केली. रोज ध्यान केल्याने रोजच्या तणावास सामोरे जाण्याची शक्ती मिळते. संतुलित आहार, पुरेशी झोप घेणे चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची आहे. या गोष्टी समृद्ध जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे.

या कार्यक्रमात कन्नड शहर आणि ग्रामीण भागातील २० कनिष्ठ महाविद्यालय आणि १५ विद्यालयाचे १२५ गुणवंत विद्यार्थी पालकांसह सत्कार स्वीकारण्यासाठी आणि व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री. टी. एस. कदम सर, स. महर्षी बाळासाहेब पवार वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार सर, प्राध्यापक रंगनाथ लहाने सर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले. उपस्थितांचे आभार सहशिक्षक श्री.अजित खंबाट यांनी मानले.

Related projects