Last Updated: 08/11/2023By Categories:

माणसाच्या बालवयात आलेले चांगले, वाईट अनुभव त्याच्या विचार व भावनांची पायाभरणी करतात. – नम्रता फलके.

भावना या नैसर्गिक असतात, व त्या विचाराच्या आधारावर तयार होतात. व्यक्तीच्या विचारावर बालवयात कुटुंबातील, आणि समाजातील आलेल्या अनुभवांचा प्रभाव असतो. आईच्या गर्भात असल्यापासूनच बालकावर जे संस्कार होतात त्याला अनुभव दिले जातात. त्यावर त्याच्या भावना व विचार वृद्धिंगत होत जातात. असे प्रतिपादन औरंगाबाद आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची भारतीय माहिती सेवा परीक्षा २०२३ महाराष्ट्रातून प्रथम व भारतातून २० व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या नम्रता फलके यांनी केले. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शनिवार व्याख्यानमालेच्या ३३ व्या पुष्पा निमित्त विचार कसे तयार होतात? या विषयावर त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संत तुकाराम महाविद्यालय, कन्नडचे प्रा. डॉ. रामचंद्र काळुंखे व सेवानिवृत्त प्रा. रंगनाथ लहाने उपस्थित होते.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, तार्किक बुद्धांकासोबतच भावनिक बुद्ध्यांक जीवनात महत्त्वाचा आहे, ज्यामुळे जीवन समृद्ध होते. मोबाईलच्या १५ सेकंदाच्या रिल्समुळे भावनांचे स्थिरीकरण होत नाही.दर १५ सेकंदाने भावना बदलतात. त्याचे वाईट परिणाम सध्याच्या पिढीवर होत आहे. मोबाईल वापर कामापुरता करून तरुण पिढीने वाचनाकडे वळावे असे, आवाहन त्यांनी उपस्थित युवक युवतींना केले.

अध्यक्षीय समारोपात प्रा. रामचंद्र काळुंखे म्हणाले की, ध्येय मोठे नसून ध्येयापर्यंत जाण्याचा प्रवास मोठा व आनंददायी असतो. ध्येय निश्चिती आणि ध्येयाचा प्रवास चांगल्या विचारांनी सोपा होतो. युवा पिढीने विचारांना समजून घेण्यासाठी स्वतःला वेळ द्यावा असे ते म्हणाले.
या कार्यक्रमास महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले.

Related projects