Last Updated: 10/11/2023By Categories:

कर्मवीर काकासाहेब देशमुख हे मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनसंग हिरो – अच्युत भोसले.

निजामाच्या, रझाकाराच्या तावडीतुन, जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेकांनी जीवाची बाजी लावली, आपल्या प्राणाची आहुती दिली. या मुक्ती संग्रामातील प्रसिद्धीपासून दूर राहिलेले एक झुंजार नेतृत्व म्हणजे काकासाहेब देशमुख हे होत, मात्र त्यांना म्हणावी तशी प्रसिध्दी न मिळाल्याने, हा माणूस ते खऱ्या अर्थाने,’मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनसंग हिरो’ होते, असे प्रतिपादन संपादक, लेखक आणि प्रगतीशील शेतकरी अच्युत भोसले यांनी केले आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील सहकारमहर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान मालेतील, ३७ वे पुष्प गुंफताना ‘मराठवाडा मुक्ती संग्रामातील अनसंग हिरोज’ या विषयावर ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात त्यांनी सांगितले की, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळाले नव्हते, मराठवाडा निजामाच्या राजकीय अंमलाखाली होता. त्यावेळी सर्व कामकाज हे उर्दू भाषेतून चालायचे, निजाम बलाढ्य, धूर्त आणि प्रचंड जुलमी होता. निजामाची, रझाकाराची जुलमी राजवट उलथून टाकण्यासाठी संपूर्ण मराठवाडाभर आंदोलन सुरु करण्यात आले होते. कन्नड, सोयगाव तालुक्यातील अनेक जिगरबाज व्यक्ती सरसावल्या होत्या. त्यात कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील कर्मवीर काकासाहेब देशमुख हे आघाडीवर होते. त्यांनी करंजखेड, मोहाडी, वासडी, पिशोर, शफेपुर, खातखेडा,आडगाव, वाकोद, पळशी, नागद, निंभोरा, उंबरखेडा, चिंचोली, घाटशेंद्रा, कन्नड, नागापूर, टाकळी अंतुर, हस्ता, मेहगाव, दिगाव, अंबा, जैनिपुरा, पातोंडा, खडकदेवळा, वडाळी, सासेगाव यासह कन्नड, सोयगाव तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांची सक्रियफळी तयार केली होती.

निजामाशी कित्येक दिवस सशस्त्र लढा दिल्यानंतर मराठवाडा निजामाच्या तावडीतुन १७ सप्टेंबर १९४८ रोजी मुक्त झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी सेवानिवृत्त अभियंता कालिदास उपासनी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विठ्ठलराव भूयागळे, दैनिक प्रसारचे वरिष्ठ पत्रकार विठ्ठल शिरसे, ज्ञानदीप क्लासेसचे रामकृष्ण तुपे, वाचनालय प्रमुख नितीन वाकळे यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. शिवाजी महाविद्यालयातील इतिहास विभागप्रमुख प्रा. भेलोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Related projects