आपल्या मुलामुलींचे पालक व्हा! मालक नव्हे. डॉ. संदीप सिसोदे.
आपल्या पाल्याचे पालन पोषण करतांना त्यांनी आपण सांगेल तसे वागावे , ऐकावे अशी पालकांची धारणा झाली आहे. पालकत्वाची भूमिका मागे पडत चालली असून पालक आता मालकाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे पाल्य आणि पालक यांच्यात संघर्ष निर्माण होत आहे त्यामुळे आई वडीलांनी मुलामुलींचे पालक व्हावे, मालक नव्हे! असे प्रतिपादन समुपदेशक व बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. संदीप सिसोदे यांनी मी पालक की मालक? या विषयावर मार्गदर्शन करताना केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड, बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आणि गौताळा व्हॅली स्कूल कन्नड यांच्या सहकार्याने आयोजित व्याख्यानमालेत ४२ व्या व्याख्यान पुष्प निमित्त ते बोलत होते. बोलतांना पुढे ते म्हणाले की, पालकांनी त्यांची भूमिका निभावताना आपल्या पाल्यांशी मनमोकळा संवाद साधणे गरजेचे आहे. त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकणे गरजेचे आहे. त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. जर मुलामुलींच्या भावनिक गरजा कुटुंबात पूर्ण झाल्या नाहीत तर ते बाहेर त्याचे पर्याय शोधतात.
याच कार्यक्रमात आनंदी पालकत्व विषयावर मार्गदर्शन करताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर, येथील मानसशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. अपर्णा अष्टपुत्रे म्हणाल्या की, आपल्या मुलांच्या चुका शोधण्याआधी आपण आपल्या चुका शोधणे गरजेचे आहे. आपण पालक म्हणून किती चांगले आहोत हे दाखवून देण्याआधी आपण माणूस म्हणून कसे आहोत? हे शोधणे गरजेचे आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित दोन्ही मार्गदर्शकांनी पालकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. यावेळी व्यासपीठावर गौताळा व्हॅली स्कूल कन्नडचे प्राचार्य डॉ. नायर हे होते तर, सेवानिवृत्त प्रा. रंगनाथ लहाने, वाचनालयाचे सचिव रामकृष्ण पवार, मुख्याध्यापक डॉ. रुपेश मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्यानासाठी गौताळा व्हॅली स्कूल कन्नड सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे पालक यांची उपस्थिती होती. उपस्थितांचे आभार गौताळा व्हॅली स्कूल चे पर्यवेक्षक आणि शिक्षक श्री. विश्वास आढाव यांनी मानले.