Last Updated: 06/11/2023By Categories:

मातृभाषेतील प्राथमिक शिक्षण मुलांच्या समृद्ध जीवनाचा पाया आहे – बाल शिक्षण तज्ञ, डॉ. मधुश्री  सावजी

बालकांच्या मेंदूचा सर्वाधिक विकासाचा काळ हा ० ते १० वर्षापर्यंत आहे. या काळात जर त्यांना मातृभाषेतून शिक्षण दिलं गेल्यास, त्याची आकलन क्षमता, सृजनशीलता वाढीस लागते, असे प्रतिपादन बाल शिक्षण तज्ञ, डॉ. मधुश्री सावजी यांनी केले.
सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि.१० जून २०२३, आयोजित व्याख्यानमालेतील पुष्प २३ निमित्त, मुलांच्या शिक्षणाचे माध्यम निवडतांना… मराठी की इंग्रजी?? या विषयावर त्या बोलत होत्या. या वेळी त्या म्हणाल्या की, मुलांना पालकांची मातृभाषा जी असेल ते मुलांच्या शिक्षणाचे माध्यम असावे. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत मुलांच्या मेंदू बरोबरच बुध्दीचा विकास गतीने होत असतो. या काळात मुलांना देण्यात येणारे अध्ययन अनुभव हे मातृभाषेतून असेल तर मुलांचा बौद्धिक विकास हा उत्तम होतो. त्यामुळे जगभरातील अनेक संशोधने, मानवी बुध्दीचा मेंदूचा अभ्यास करणारे डॉक्टर, शास्त्रज्ञ यांनीही वैज्ञानिक दृष्या मुलांच्या मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
यावेळी स्थानिक शाळांमधील शिक्षक, प्राध्यापक आणि पालक उपस्थित होते. या वेळी व्यासपीठावर प्रा. रंगनाथ लहाने आणि वाचनालयाचे सचिव आर. के. पवार उपस्थित होते. सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले.

Related projects