Last Updated: 08/11/2023By Categories:

पुस्तकं ही अनेक थोर, महान लोकांना भेटण्याची सर्वात मोठी संधी – मा. जीवन इंगळे. (१३ वर्षांपासून सायकलवर ग्रंथ प्रसार कार्य व अध्यक्ष, सर्वोदय सामाजिक संस्था काटेवाडी, बुध ता. खटाव, जि. सातारा)

पुस्तके आपली मित्र झाली पाहिजे, पुस्तकातून अनेक थोर, महान लोकांना भेटण्याची संधी मिळते व पुस्तकांतूनच आपल्याला आपल्या सर्व समस्यांचे उत्तर मिळते, असे प्रतिपादन सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व तेरा वर्षापासून सायकलवर ग्रंथ प्रसार करणारे मा. जीवन इंगळे यांनी केले. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित “वाचू आनंदे” या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या फिरत्या वाचनालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय भोसले अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर डॉ. ए. के. महाले (सदस्य श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कन्नड) यांची प्रमुख उपस्थिती होती.

तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक याचा रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त व राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाचे औचित्य साधून त्यांच्या व सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून झाली.

मा. जीवन इंगळे बोलतांना पुढे म्हणाले की, नव्या पिढीला संस्कारक्षम घडवायचे असेल तर पुस्तक वाचण्याशिवाय पर्याय नाही. आजपर्यंत जी मोठी, थोर लोकं होऊन गेली ती नेहमी पुस्तकाच्या संगतीत राहिली म्हणून ती इतकी मोठी झाली, मोठ्या पदावर गेली. विद्यार्थ्यांच्या समोर बोलताना त्यांनी श्यामची आई हे पुस्तक, ग्रेटा थनबर्ग, गर्विता गुलाटी, दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवन प्रवासावर व सामाजिक योगदानावर भाष्य केले. तसेच त्यांच्या स्वतःच्या सायकल वरून ग्रंथप्रसाराच्या तसेच सामाजिक कामाचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला.

मा. जीवन इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाचू आनंदे या शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या फिरत्या वाचनाच्या मोटरसायकलला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. विजय भोसले यांनी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि सशक्त समाज उभारणीसाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या मा. जीवन इंगळे यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला. साधी राहणी आणि उच्च विचासरणी अंगिकारून, एका सामान्य शेतकरी कुटुंबातील एक मुलगा समाजाची सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून सर्वोदय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून फिरत्या वाचनालया बरोबरच अनेक सामाजिक उपक्रम कोणत्याही सरकारी मदती शिवाय करतो, यांचे याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले.

त्यांचा जीवन प्रवास हा फक्त स्वतः पुरता विचार करणाऱ्या समाजातील काही घटकांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडतो, असे ते आवर्जून म्हणाले.याप्रसंगी निवृत्त प्राध्यापक रंगनाथ लहाने, तिफण त्रैमासिकाचे संपादक, तिफणकार, कवी, डॉ. शिवाजी हुसे, बोलीभाषा अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी, दैनिक शिवनातीरचे संपादक मधुकर महाले, प्रा. अशोक भोसीकर व ग्रंथपाल प्रा.संतोष देशमुख उपस्थित होते.

Related projects