Last Updated: 06/11/2023By Categories:

समाज माध्यमावर वावरतांना विद्यार्थांनी सामाजिक भान ठेवणे गरजेचे – रेणुका कड, सामाजिक कार्यकर्त्या
इंटरनेटच्या माध्यमातून फेसबुक, व्हाटस ऐप, इंस्टाग्राम, ट्विटर या सारख्या समाज माध्यमावर वावरतांना सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे. समाजभान न ठेवता समाज माध्यमांचा वापर हा समाजासाठी व स्वतःसाठी घातक ठरू शकतो. आपली व्यक्तिगत माहिती सार्वजनिक करू नये, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या आणि सायबर गुन्हे व सुरक्षा विषयातील तज्ञ रेणुका कड यांनी केले.

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शुक्रवार दि. २८ जुलै २०२३ रोजी व्याख्यानमालेच्या पुष्प ३० निमित्त त्या बोलत होत्या. बोलतांना त्या म्हणाल्या कि, आपल्या एका चुकीच्या कृतीमुळे एखाद्या व्यक्तीला त्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागतात. समाज माध्यमांच्या चुकीच्या वापरातून अथवा अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री, आपली व्यक्तिगत माहिती शेअर केल्यामुळे आपली आर्थिक फसवणूक तसेच शारीरिक, मानसिक, भावनिक आणि लैगिक छळ होऊ शकतो. त्यांनी सायबर गुन्हे व त्यांचे प्रकार आणि त्यापासून कसे सुरक्षित राहावे, कोणकोणत्या प्रकारे आपली फसवणूक होऊ शकते हे सद्यस्थितीत घडत असलेल्या उदाहरणे देऊन या विषयी मार्गदर्शन केले.

सामजिक माध्यमे वापरतांना कुणी त्रास देत असेल कुणी पाठलाग करत असेल तर सर्वात आधी आपल्या जवळच्या व्यक्ती सोबत या विषयी बोलावे किंवा १८ वर्षाच्या आतील मुलामुलीनी १०९८ वर चाईल्ड लाईन सेवा अथवा १०० नंबर डायल करून पोलिसांची मदत घेऊ शकतात नक्की घ्या. असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी व्यासीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी मुलांच्या कन्नड येथील शासकीय वस्तीगृहाचे गृहपाल श्री. आर बी तडवी व मुलीच्या वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती तायडे आणि वसतिगृहातील मुले मुली यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाकळे यांनी केले. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे शिक्षक श्री. त्रिभुवन सर यांनी आभार मानले.

Related projects