शालेय विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय सहलीचे आयोजन. सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड येथे वाचन प्रेरणा दिवस साजरा.
भारताचे दिवंगत राष्ट्रपती, थोर वैज्ञानिक, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय कन्नड यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यासाठी ग्रंथालय सहल आणि एक तास ग्रंथ वाचन हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमात कन्नड शहरातील कै. काशिनाथ पा. जाधव प्राथमिक विद्यालय, कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथालयास भेट देऊन ग्रंथालयाची कार्यपद्धती समजून घेतली यावेळी ग्रंथालय अधीक्षक नितीन वाकळे आणि ग्रंथपाल नरेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनतर एक तास आपापल्या आवडीचे बालसाहित्य विभागातील पुस्तक वाचले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आणि सहकार महर्षी बाळासाहेब पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना एक तास पुस्तक वाचनासाठी काही निवडक पुस्तके उपलब्ध करून दिली. या वेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय जाधव, शिक्षक श्री पुजरोड व कै. काशिनाथ पा. जाधव प्राथमिक विद्यालय, कन्नड येथील शिक्षक श्री. पांडव सर हे उपस्थित होते. संजय जाधव आणि श्री. पांडव यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथ वाचनाचे महत्व आणि वाचन प्रेरणा या विषयावर मार्गदर्शन केले. नितीन वाळके यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.