Last Updated: 06/11/2023By Categories:

कवितेचे माहेरघर म्हणून कन्नडची ओळख व्हावी – डॉ.शिवाजी हुसे सर

कन्नड शहरातील सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालयाच्या अठराव्या वर्धापन दिना निमित्त दि. २० मे रोजी सायंकाळी पाच वाजता बहारदार कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठसाहित्यीक तिफणकार डॉ. शिवाजी हुसे हे होते, आपल्या मनोगतात ते म्हणाले की कन्नड तालुक्यातील जवळपास तीस प्रतिभावान कवी आणि कवयित्री अतिशय प्रगल्भ,दर्जेदार, सामाजिक भान असणाऱ्या कविता लिहीत आहेत आणि त्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढत आहे,यामुळे भविष्यात कन्नडची ओळख कवितेचे माहेरघर म्हणून निर्माण होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली, सुत्रसंचालन कवी संदिप ढाकणे यांनी केले.

कवी ज्ञानेश्वर गायके यांनी माझ्या कन्नडच्या भूमीत, काळी भुई घाटमाथा देव, वाकी कालिमठ झुके भक्ती भावे माथा ह्या कवितेतून कन्नडची महती काव्यातून गायली तर झोप कशी येते तुला, सिमेंटच्या घरात, माय थंडीने मरतेय, झोपडीच्या दारात, या कवितेतून संदिप वाकडे यांनी तरुणाई चे कान टोचले. काय लिहावं, काय सुचाव,मन निशब्द झालंय हल्ली, कवियत्री शुभदा देवरे यांनी वर्तमान परिस्थितीची जाणीव करुण दिली. ढवळ्या पवळ्याच्या संगती, बाप कामाला जूंपला, हिर शिवार फुलीन जीव आशेत गुंतला, या कवितेतून प्रा. रमेश वाघचौरे यांनी शेती मातीची व्यथा मांडली. एके दिवशी त्याने तिला गिफ्ट दिलं मोठ, अहो गिफ्ट असल मोठ, गुंडाळलेल्या कागदाने दिसत होत मोठ, त्याच्या प्रेमाच्या रंगाने तीच नाव रंगवलेल, या प्रेम कवितेतून लक्ष्मण वाल्डे यांनी वातावरण फुलवीले. संकटाशी आम्ही करतो चार हात, भीत नाही कशाला, ही शेतकर्यांची जात या कवितेतून प्रविण दाभाडे यांनी शेतकऱ्याच्या धैर्याची जाणीव करुण दिली. वासे फिरले ना चौकट मोडली, तुझे दुःख अजून घरंदाज आहे, म्हणूनच का तू आतून कडी घातली या कवितेतून कवी समाधान निकम यांनी काळजाचा ठाव घेतला.अमोल भिलंगे यांच्या लगीन कवितेने कार्यक्रमात रंगत आली. कवी श्रीराम दापके, अमोल मोकासे, आदींनी ही आपल्या कविता सादर केल्या.

व्यासपीठावर प्रा. रंगनाथ लहाने, डॉ. अंबादास सगट, जेष्ठ विधिज्ञ ड. कृष्णा पाटील जाधव, सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे प्राचार्य संजय जाधव, साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रविण दाभाडे, जेष्ठ चित्रकार लिलाधर पाचपोळे, श्री नलावडे,श्री भूयागळे, एस. के. पाटील, अधीक्षक नितीन वाकळे आदींसह काव्य रसिक उपस्थित होते.

Related projects