विद्यार्थी जीवनात मूल्यशिक्षण महत्त्वाचे – माया थोरात – नवथर (समुपदेशक)
चांगली मूल्ये जीवन घडवितात. त्यामुळे चांगल्या मूल्यांना जीवनात महत्व द्यावे. मूल्ये नसतील तर जीवनात कमवलेला पैसा, संपत्ती निरर्थक ठरते. असे प्रतिपादन समुपदेशक माया थोरात – नवथर यांनी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड आयोजित, शनिवार व्याख्यानमालेत, पुष्प ३५ मध्ये बोलतांना केले.
मूल्यशिक्षण- काळाची गरज याविषयी शनिवार(२ सप्टेंबर २०२३) रोजी आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या. बोलतांना पुढे त्या म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शिस्त, स्वावलंबन , नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, सहनशीलता, संवेदनशीलता, वैज्ञानिक दृष्टीकोन, राष्ट्रभक्ती, सर्वधर्म सहिष्णुता, श्रमप्रतिष्ठा आदी मूल्ये जीवनात अंगिकारावी, ज्यामुळे जीवन समृध्द होईल. जीवनात मूल्याचा ऱ्हास झाल्यामुळे सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्न समाजासमोर उभे ठाकले आहे. त्यांना सामोरे जायचे असेल तर मूल्य शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे त्या समारोपाच्या वेळी म्हणाल्या.
यावेळी व्यासपीठावर प्रा. रंगनाथ लहाने आणि क्रीडा शिक्षक अजित खंबाट यांची प्रमुख उपस्थिती होती.