स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासाचे योग्य नियोजन आणि निश्चित ध्येय विद्यार्थांना ताण- तणावापासून मुक्त करेल. अंकुश शिंदे(समुपदेशक, मोटिव्हेशनल ट्रेनर, लेखक)
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरवून योग्य नियोजन केले तर अभ्यासामुळे अथवा यशअपयशामुळे येणाऱ्या ताण तणावापासून विद्यार्थी मुक्त होईल, असे प्रतिपादन अंकुश शिंदे(समुपदेशक, मोटिव्हेशनल ट्रेनर, लेखक)यांनी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड आयोजित, शनिवार( ९ सप्टेंबर २०२३ )व्याख्यानमालेत, पुष्प ३९ निमित्त बोलतांना केले.
बोलताना पुढे ते म्हणाले कि, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा मन आणि बुद्धी एकाग्र करून केल्यास निश्चित यश मिळते. ज्या प्रमाणे आपण अनेक वर्षापूर्वी पाहिलेला सिनेमा आपल्याला जसाच्या तसा आठवतो, त्याचे संवाद आपले तोंडपाठ असतात. कारण आपण ते तितक्याच तन्मयतेने पाहिले व ऐकलेले असते. जर तेच तंत्र अभ्यासासाचे वापरले तर नक्कीच स्पर्धा परीक्षामधील यश दूर नाही.
या वेळी व्यासपिठावर प्रा. भूयागळे, महाराष्ट्र शासनाच्या अमृत या स्वायत्त संस्थेचे विभागीय समन्वयक श्री. दीपक जोशी उपस्थित होते. या कार्यक्रमास सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय, कन्नड येथील अभ्यासिकेचे विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सूत्रसंचालन नितीन वाळके यांनी केले.