Last Updated: 06/11/2023By Categories:

दि.१५ एप्रिल २०२३, वार शनिवार रोजी सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय आणि बाळासाहेब पवार फाऊंडेशन कन्नड यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या व्याख्यानमालेचे १६वे व्याख्यान पुष्प गुंफण्यात आले. आजच्या व्याख्यानमालेत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती निमित्त ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रेम या विषयावर प्रसिद्ध साहित्यिक, व्याख्याते डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.अरविंद कांबळे, सेवानिवृत्त जेष्ठ लेखापरीक्षक तसेच अध्यक्ष सेवानिवृत्त कर्मचारी संघटना कन्नड श्री. कुंभकर्ण साहेब, नवोदय विद्यालयाचे शिक्षक श्री. चंद्रमणी मनवर उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉ. गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ प्रेम या विषयावर प्रकाश टाकला. या वेळी बोलताना ते म्हणाले की, बाबासाहेबांना ग्रंथ, पुस्तके वाचनाची प्रेरणा त्यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या कडून मिळाली. बालवयात त्यांना हा संस्कार वडिलांकडून मिळाला.

डॉ. बाबासाहेबांना केळुस्कर गुरुजींनी स्वलिखित बौद्ध चरित्र भेट दिली आणि त्या नंतर खऱ्या अर्थाने डॉ. आंबेडकरांचा पुस्तक वाचन प्रवास सुरू झाला. ग्रंथ प्रेमापोटी त्यांनी अनेक आव्हाने पेलल्याची अनेक उदाहरणें आपल्या व्याख्यानात डॉ. गायकवाडांनी दिली. तसेच जगाच्या इतिहासात त्यांनी वाचलेल्या पन्नास हजार पुस्तकांसाठी आलिशान घर स्वखर्चातून बांधणारे डॉ. आंबेडकर हे एकमेव व्यक्ती होती, असे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी त्यांनी मनुष्याच्या जीवनातील वाचनाचे महत्व अधोरेखित केले. या कार्यक्रमांत सलग १४ तास अभ्यास उपक्रमात १० आदर्श वाचक विद्यार्थ्यांना ग्रंथ, पुष्प आणि सन्मान प्रमाणपत्र व उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. या वेळी सलग १४ तास वाचन उपक्रम संयोजन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. श्री अरविंद कांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात व्याख्यानाचा सारांश उपस्थितांसमोर मांडला. डॉ. रुपेश मोरे यांनी आभार मानले. नितीन वाकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related projects