Last Updated: 08/11/2023By Categories:

मराठी बोलीभाषांना गावंढळ, ग्राम्य समजू नये. -डॉ. रमेश सूर्यवंशी (ज्येष्ठ बोलीभाषा अभ्यासक, कन्नड)  अनेक बोलीभाषांची मिळून मराठी प्रामाणिक भाषा तयार झाली आहे. प्रामाण्य मराठीत असलेले शब्द बोलीभाषेतूनच आलेले आहेत. तसेच बोलीभाषांचे सुद्धा प्रामाणिकरण व्हायला हवे, असे प्रतिपादन बोलीभाषांचे गाढे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांनी केले.

सहकार महर्षी बाळासाहेब पवार सार्वजनिक वाचनालय व बाळासाहेब पवार फाउंडेशन कन्नड, मराठी भाषा संशोधन केंद्र मराठी विभाग शिवाजी महाविद्यालय कन्नड आणि भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषद शाखा कन्नड जिल्हा औरंगाबाद आयोजित, तिफण बोलीभाषा विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, मराठी भाषा समृद्ध करण्यात बोलीभाषांचे विशेष योगदान आहे. मराठी जर टिकवायची असेल तर बोलीभाषांचे प्रामाणिकरण झाले पाहिजे.
या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक करताना तीफण बोलीभाषा विशेषांकाचे संपादक डॉ. शिवाजी हुसे यांनी तिफण त्रैमासिकाचा प्रवास उपस्थितांसमोर समोर उलगडून सांगितला. तीफणच्या वाटचालीत ज्यांचे ज्यांचे सहकार्य, मार्गदर्शन लाभले त्यांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तीफण विचारांची पेरणी करणारे त्रैमासिक आहे असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक बुर्गाड या बहुचर्चित कादंबरीचे लेखक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. महेश खरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर शिवाजी महाविद्यालय कन्नडचे प्राचार्य डॉ. विजय भोसले हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. डॉ. रमेश सूर्यवंशी यांच्या हस्ते तिफण बोलीभाषा विशेषांकांचे मान्यवरांच्या व उपस्थितांच्या उपस्थितीत अनावरण झाले.

अध्यक्षीय समारोपात डॉ. विजय भोसले यांनी तिफण बोलीभाषा विशेषांकाचे व संपादकाचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमास कन्नड शहर व ग्रामीण भागातील कवी, साहित्यिक, प्राध्यापक, शिक्षक व साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामचंद्र झाडे यांनी केले तर, आभार कवी ज्ञानेश्वर गायके यांनी मानले.

Related projects